जळगाव :– तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील ज्योती गजानन फुसे (वय २८) या विवाहितेची शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने रक्ताची गरज भासली; परंतु रुग्णालयात वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने या विवाहितेचा मृत्यू झाला.

ज्योती फुसे यांना शुक्रवारी सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. काही वेळातच त्यांनी मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर त्यांच्या शरीरातील रक्त कमी झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवले. तसेच रक्ताचा पुरवठा करण्यास सांगितले. रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त शिल्लक नसल्याने खासगी रक्तपेढ्यांकडे नातेवाईक गेले. या वेळी त्यांचे पती गजानन यांनी स्वत:चे रक्त दिले. मात्र, दोन तास उलटून गेल्यानंतर त्याच दिवशी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. पहिल्याच प्रसूतीच्या वेळी ज्योती यांच्यावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, त्यांचे पती गजानन फुसे यांनी रुग्णालयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
