वेल्हाळ्यात कृषी दिनालाच शेतक-याचा जाहीर आत्महत्येचा प्रयत्न ; अधिका-यांची दमछाक

0

पाच तासाचे थरार नाट्य : आश्वासनाने तिढा सुटला ;

भुसावळ :- तालुक्यातील वेल्हाळे येथे अखंडीत वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्याने जाहीर फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थासह प्रशासनात खळबळ उडाली. दरम्यान, यावेळी शेतक-याला खाली उतरविण्याकरिता प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान अधिका-यांनी आश्वासन देऊन समजूत काढून संबंधीत शेतक-याला झाडावरून खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.

तालुक्यातील वेल्हाळे गावासह आणि परिसरातील शेतकरी वारंवार होणा-या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. खंडित विजपुरवठयामुळे शेतीमध्ये वेळेवर पाणी देऊ शकत नाही. यामुळे त्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. तर दुसरीकडे वन्य प्राण्यांनी देखील परिसरात धुमाकुळ घातला असून यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमिवर काही शेतकर्यांनी याआधीच वीज वितरण विभागाला अर्ज देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तथापि, याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे आज 1 जुलै कृषिदिनालाच सकाळी दहा वाजेच्या सुमारास योगेश आत्माराम पाटील या शेतकर्याने झाडावर चढून गळफास घेण्याची तयारी केल्याने गावात खळबळ उडाली.

गावकर्यांनी योगेश पाटील यांना झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याला नकार दिला. थोड्याच वेळात पोलीसांसह वीज वितरण आणि महसूल खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी विनंती करूनही योगेश पाटील खाली उतरण्यास तयार नव्हते.वारंवार विनंती करून देखील शेवटी वीज वितरणा तर्फे अखंडित वीज पुरवठ्याचे आश्वासन देऊन वन खात्याला वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्यानंतर तो तब्बल पाच तासांनी खाली उतरला . दरम्यान, या पाच तासांमध्ये वेल्हाळे गावात शेतक-याची जाहीर आत्महत्या व अधिका-यांना करावी लागलेल्या कसरतिने चांगलीच तारांबळ उडाली अन या नाट्यावर अखेर पडदा पडला .व हुश्श म्हणत अधिका-यांनी सुटकेचा श्वास सोडला .
घटनास्थळी कार्यकारी अभियंता बोराडे ,तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार , वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक सारीका कोडपे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.