मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात हळूहळू वृत्तपत्रांचं वितरण पूर्णपणे बंद झालं होत. मात्र आता वृत्तपत्र वाचकांसाठी खुशखबर मिळत आहे. येत्या १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा वृत्तपत्रांचे वितरण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व मराठी, इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रांचे वितरण १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. राज्यातील वृत्तपत्रांनी याबाबात निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा संसर्गाच्या संशयातून राज्यातील वृत्तपत्रांनी वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेले काही दिवस सकाळच्या फक्कड चहासोबत वृत्तपत्र वाचण्याची सवय असणाऱ्यांना ऑनलाईन ई-पेपरवरच आपली बातम्या वाचनाची तहान भागवावी लागत होती. दरम्यान, WHOकडून वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा धोका नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर आता वृत्तपत्र पुन्हा वाचकांसाठी छापील स्वरूपात १५ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहेत.