विजेच्या लंपडावाने नागरिक हैराण ; हजारो कुटुंबियांचे रात्रभर जागरण

0

जळगाव | प्रतिनिधी 

शहरातील पिंप्राळा परिसर वारंवार वीज गुल होत असल्याने अनेकांची विद्युत उपकरणे जळाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. रात्री वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने हजारो कुटुंबियांनी रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली.
पिंप्राळा परिसरातील गणपतीनगर, मयुर कॉलनी, संत मिराबाईनगर, गौरव पार्क, निसर्ग कॉलनी, भैरव नगर, मंगलमुर्ती नगर, आनंद मंगल सोसायटी तसेच महाबळ परिसरातील मोहन नगर, महाबळ, समतानगर, संभाजी नगर, हुडको, खंडेराव नगर आदी भागात शुक्रवारी मध्यरात्री नंतर विजेचा लंपडाव सुरु झाला. शुक्रवारी या भागातील वृक्षांच्या फांद्या छाटण्याकरीता महावितरणकडून सकाळी ९ वाजेपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत हे काम सुरु असल्यामुळे दुपारी तीन वाजेनंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. यामुळे दिवसभर लहान बालके, वयोवृध्द नागरिकासह सर्वांना उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला. त्यानंतर रात्री शांततेची झोप घेण्यासाठी नागरिकांनी तयारी केली असता. रात्री पुन्हा वीज गुल झाली. एक वेळा दोन वेळा वीज गुल झाल्यानंतर वीज सुरळीत होईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु वारंवार वीज खंडीत होत असल्याने नागरिक घामाघुम झाले होते. आधिच वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे नागरिक घामाने परेशान झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणच्या काही अधिकारी- कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पुर्ण रात्र जागून काढावी लागली.

अधिकारी फोन घेईना

नागरिकांनी महावितरणच्या हुडको सबस्टेशनचे अभियंता व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता अभियंता चौधरी यांनी फोनच उचलला नाही, तसेच नागरिकांनी हुडको सबस्टेशनला संपर्क केला असता हुडको सबस्टेशनमधून कर्मचाऱ्यांनी होईल, काम सुरु आहे, बघतो, करतो अशा स्वरुपाचे उत्तरे दिल्याचे सांगण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.