Wednesday, February 1, 2023

विहित कालावधीत निधी खर्च होणारेच प्रस्ताव सादर करावेत ; जिल्हाधिकारी राऊत

- Advertisement -

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेमधून प्राप्त होणारा निधी विहित कालावधीत खर्च होणार असेल तरच प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. ज्या विभागांना निधी प्राप्त होऊनही खर्च होणार नाही त्यांचेवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठकी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. गावीत, योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचेसह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांमधून प्रस्ताव सादर करतांना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. विकास कामे सुचवितांना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा. विशेषत: शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. सुचविलेली कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. त्यानुसारच कामांचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे सन 2021-22 चा प्रारुप आराखडा तयार करतांनाही मुलभूत बाबींना प्राधान्य राहील याकडे सर्व विभागांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याला सन 2020-21 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 375 कोटी, एससीपी 91.59 कोटी, टीएसपी 17 कोटी 88 लाख 94 हजार, तर ओटीएसपी योजनेसाठी 28 कोटी 95 लाख 57 हजार असा एकूण 513 कोटी 43 लाख 51 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतुद प्राप्त झाली असून सर्व निधी बीडीएसवर प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत विविध योजनांमधून 44 कोटी 67 लाख रुपयांचा निधी विविध विभागांना वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कोरोना प्रंतिबंधासह इतर विभागांनाही विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. प्राप्त तरतुदीशी आतापर्यंत खर्चाची टक्केवारी 7.21 टक्के तर जिल्हाधिकारी यांनी वितरीत केलेल्या तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 84.55 टक्के इतकी असल्याचेही श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे