विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात LG पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला असून 5000 हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले.तसेच, दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे हाहाकार उडाला.ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेवर विचारविनिमय करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली आहे.


