जळगाव :- केवळ ज्ञान आणि माहिती मिळाली म्हणून संघटना कृतिशील होत नाही. त्यासाठी विचारांनी प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने कृतीशील असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते. आज समितीकडे तरुणांची टीम असल्याने संघटना मजबूतपणे उभी आहे. विवेकी विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र अंनिसने यशस्वीपणे पार पाडली आहे व पुढेही सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जळगाव जिल्ह्याची बैठक भुसावळ येथे प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर होते. प्रसंगी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून रविंद्र चौधरी यांनी समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. त्यानंतर वर्धा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त वाचून आगामी उपक्रमाविषयी सांगितले.
प्रा. कट्यारे यांनी वैज्ञानिक जाणीव प्रकल्प आणि विविध उपक्रम राबविण्याबाबत माहिती दिली. यावेळी, राजेंद्र बाविस्कर यांनी, सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धा सुटायला हव्यात असे सांगून आपण विज्ञान शिकतो पण जीवनात त्यांचा दृष्टिकोन घेत नाही याबाबत खेद व्यक्त करीत समाजसुधारकांचा जयकार खूप होतो पण त्यांचे विचार मात्र कोणी वाचताना व आचरताना दिसत नाही असे सांगितले. जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी, पुढील जानेवारी महिन्यात जळगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीविषयी प्राथमिक नियोजन सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
सूत्रसंचालन प्रा. निलेश गुरचळ यांनी केले तर आभार राजेश तायडे यांनी मानले. बैठकीला जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.