मुंबई । कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. खुद्द नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे.
नाना पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि,”गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूर परिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये” असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
याशिवाय ”गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन” असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, ऐन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने अधिवेशनावर कोरोनाचे सावट आणखी गहिरं झालं आहे.