विद्यापीठाच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा आणि महाविद्यालये सुरू करा ; विद्यापीठ विकास मंचचे निवेदन

0

भडगाव (प्रतिनिधी) : शासनाने विद्यापीठाच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा आणि विद्यापीठातील व महाविद्यालयातील वर्ग सुरू करावे या मागणीसाठी विद्यापीठ विकास मंच, यांच्या वतीने तहसीलदार व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष श्री.सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन केले आहे. विद्यापीठ कायद्यात अनावश्यक बदल करून विद्यापीठीय कामकाजामध्ये ढवळाढवळ करणे आणि राज्यपालांचे अधिकार कमी करून त्यात राजकीय हस्तक्षेप वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत असून विद्यापीठ विकास मंचने याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला, मुंबई विद्यापीठात कुलसचिवांची नेमणूक करून विद्यापीठाच्या कामकाजात अवैधरीत्या हस्तक्षेप करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला कोर्टाने फटकारले असून शासनाने यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मार्च – २०२० पासून बंद असलेले विद्यापीठ व महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ग शासनाने त्वरित सुरू करून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी देखील या निवेदनाव्दारे विद्यापीठ विकास मंचने केलेली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासनाने झोपेचे सोंग घेतलेले असून एकीकडे नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होऊन विनाअडथळा अतिशय सुरळीतपणे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झालेले आहे. शिवाय 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरु होत आहेत. म्हणजेच वयाने लहान विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सकारात्मक विचारातून पुन्हा प्रत्यक्ष शिक्षणाचा शुभारंभ केला आणि दुसरीकडे करतो – करतो म्हणत पदवी आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार म्हणजे हे शासनाच्या निर्णय घेण्यास असक्षम व अकार्यक्षमतेचेच उदाहरण आहे असेही विद्यापीठ विकास मंचने म्हटले आहे. बऱ्याच विद्यापीठांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत मात्र प्रत्यक्ष शिक्षण अद्याप सुरू झालेले नाही, विद्यार्थी महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यास शासनाने अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही. पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करून महाविद्यालय सुरू करण्याचे घोषित केल्यानंतर शासनाने परत त्यांनाच जाब विचारून विद्यापीठ व महाविद्यालय शासनाच्या परवानगी शिवाय सुरू करता येणार नाही असे ठणकावले, या दडपशाहीचा देखील विद्यापीठ विकास मंचने निषेध केला आहे.

विद्यापीठ कायद्यात बदल करून आपला राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न सरकारने त्वरित थांबवावा. तसेच विद्यापीठ व महाविद्यालय त्वरित सुरू करावे अशी मागणी विद्यापीठ विकास मंच करीत असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. याप्रसंगी सिनेट सदस्य अमोल नाना पाटील,वि.वि. मंच भडगाव तालुकाप्रमुख बन्सीलाल परदेशी, सहप्रमुख प्रदिप सोमवंशी, सदस्य प्रशांत कुंभारे, किरण शिंपी, शरद हिरे, बाळू मांडोळे, नामदेव मालचे इ. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.