जळगाव । वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या वाल्मीकनगर परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी सकाळी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे जळगाव आसोदा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाल्याने खोळंबा झाला होता. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तडवी आणि आ. राजूमामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, धुडकु सपकाळे आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आश्वासनानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र दोन दिवसात वीजपुरवठा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी नागरिकांनी थकबाकी न भरल्याने त्यांचे मीटर काढण्यात आले होते. यामुळे परिसरात कालपासून वीज नसल्याने संतप्त रहिवाशांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.वाल्मिक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वत्सलाबाई सोनवणे, मंगलाबाई रमेश मराठे, विलास बाविस्कर, अनिल सपकाळे यांच्यासह परिसरातील महिला पुरुष आणि मुले मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
वाल्मिकनगर, मेस्कोमातानगर, कांचननगर, दुलचंदनगर आदी भागातील थकबाकी असल्याने महावितरणने वीज मीटर काढून टाकले होते. मात्र, पर्यायी रस्ता म्हणून रहिवाशांनी आकडे टाकायला सुरुवात केली होती. मात्र, डीपी वारंवार लोडींगमुळे बंद पडत असल्याने अखेर महावितरणने डीपी काढून टाकल्याने परिसरात गेल्या 24 तासांपासून अंधार आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान वाल्मिक नगरातील हनुमान मंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.