रावेर | तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने सहाय्यक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांचा मृत्यू झाला होता.घटनेला तीन-चार दिवस उलटूनही तपासात अपेक्षित सुगावा लागलेला नाही. दरम्यान, पोलिस पथकाने गुरुवारी चौघांची चौकशी करून सोडून दिले होते. यापैकी दोघांना पुन्हा ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे. बँकेत दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता गृहीत धरून पथकांनी मध्य प्रदेशातील खंडवा, खरगोन, नेपानगर, बऱ्हाणपूर परिसरात तपासावर लक्ष केंद्रीत केले आहे.
गुरुवारी चौकशी करून सोडून दिलेल्या तापी काठावरील गावातील दोघांना शुक्रवारी पुन्हा बोलावून विचारपूस झाली. हल्लेखोरांच्या हालचाली सारखीच संशयितांची देहबोली (बॉडी लँग्वेज) असल्याने दोघांना सहा ते आठ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली (परेड) करायला लावली. दुसरीकडे हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार आणि मध्य प्रदेशातील असावे. त्यांनी पाळत ठेवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
जबरी चोऱ्या, घरफोड्यांमधील गुन्हेगारांचा शोध
या संशयावरून खंडवा, खरगोन, बऱ्हाणपूर, नेपानगर या भागात आधी झालेल्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांमधील गुन्हेगारांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहे. नाशिक परिक्षेत्राचे आयजी छेरिंग दोर्जे या घटनेनंतर सलग तीन दिवस जळगावात तळ ठोकून असल्याने पोलिस यंत्रणा कमालीची सक्रिय झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जळगाव, नाशिक, नगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळी पथके या गुन्ह्याचा तपास करत आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर कोणत्या दिशेने पळाले? याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक गाव पिंजून काढा असे आदेश आयजी छेरिंग दोर्जे यांनी दिले आहेत. त्यानुसार रावेर पोलिस स्टेशनमधून अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी तपासाबाबत सखोल चर्चा केली.