विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जखमी

0

जळगाव दि. 5-
तालुक्यातील सावखेडा येथील दोन तरुण आपल्या दुचाकीने जळगावहून सावखेडा येथे घरी जात असताना समोरुन येणार्‍या बसवरील ठेवलेली स्टेपनी अंगावर पडून जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला तरुण जबर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास करंज गावाच्या पुढे असलेल्या वळणावर घडली.
सावखेडा येथील तरुण घनश्याम उमाकांत पाटील(35) व तापीराम माधव पाटील (34) हे चुलतभाऊ आपली दुचाकी क्र. एम. एच. 19 सीपी 0843 ने जळगावी कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यावर पुन्हा सावखेडा येथे जात असताना सावखेड्याजवळील करंज या वळण रस्त्यावर समोरुन भोकर- जळगाव बस क्र.एम. एच. 20-बीएल 2414 येत होती. सदर बसच्या टपावर स्टेपनी ठेवली होती. ती रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उसळून अचानक अंगावर पडून झालेल्या अपघात मोटारसायकल चालक घनश्याम पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर तापीराम पाटील हा जबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर बसचालक देविदास कोळी व वाहक विशाल थोरात यांनी अंतरावर बस थांबवली. हे वृत्त सावखेडा येथे समजताच खळबळ उडाली. व गावकर्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सावखेडा गावातील सुरेश पाटील यांनी धटनास्थळी चारचाकी आणून त्यात दोघा जखमींना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ आणले असता घनश्याम यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले तर तापीराम यावर शर्थीचे उपचार सुरु आहेत. घटनेचा गुन्हा दाखलचे काम तालुका पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंच चालू होते.
दरम्यान घनश्याम हा गरीब, मनमिळाऊ, सतत हसतमुख होता शेतीकाम सांभाळत होता विवाहित असून घरातील कर्ता तरुण होता. त्याच्या अपघाती जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

घटनेला जबाबदार कोण?
एसटीच्या टपावरील ठेवलेली स्टेपनी उसळून खाली पडून अपघात घडला. या घटनेत एसटी कर्मचार्‍यांकडून एसटीच्या टपावर ठेवलेली स्टेपनी बांधण्यात येते. मात्र सदर घटनेत ती मजबूतपणे बांधलेली नसावी. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे बस उधळून एवढी अवजड स्टेपनी खाली पडते कशी? स्टेपनी बांधलेली असती तर उसळली नसती. रस्त्याची स्थिती खराब असताना चालकाने बसचा वेग कमी करायला हवा होता. बस वेगात असल्याने खड्ड्यातून बस उसळली. तर जिल्ह्यात रस्त्यांची पूर्ण चाळणी झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतो. मात्र या घटनेतील जबाबदार घटकांमुळे अपघात घडला मात्र त्यात एका सर्वसामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.