महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक प्रचारात रंगत चढली आहे. रविवार महाराष्ट्रात पंतप्रधान नद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी,उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या जाहीर सभांनी गाजला.
पंतप्रधान नद्र मोदी यांची महाराष्ट्रात पहिली सभा जळगावला झाली. जळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण घालेली होती. शहरापासून 6 किलोमिटर अंतरावर झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला लाखापेक्षा जास्त गर्दी उसळली होती. लाख लोक सावलीत बसून मोदींचे भाषण ऐकू शकतील असे भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले होते. सभेला महिलांचीही संख्या लक्षणीय अशी होती. तरुण वर्गाचा जोश ओसंडून वाहत होता. व्यासपीठावर पंतप्रधानांच्या उजव्या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन बसलेले होते. जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे 11 उमेदवार दोन्ही खासदार धुळ्याचे खा. डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या आधी 15 मिनिटांचे मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. त्यानंतर बरोबर साडेबारा वाजता मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि त्याला श्रोत्यांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोदी- मोदींच्या घोषणांनी सभा दणाणली. आपल्या भाषणात मोदींनी लोकसभेला जो महाजनादेश दिला तसाच महाजनादेश महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत तुम्ही दिलेल्या प्रचंड महाजनादेशामुळे गेल्या 70 वर्षात जम्मू काश्मिर लडाखच्या बाबतीतील 370 कलम रद्द करण्याच्या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही. परंतु भाजप सरकारने ते 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले. तीन तलाकही रद्द करुन मुस्लिम महिलांना संरक्षण देण्यात आले. 370 कलम आणि तीन तलाक ह्या मुद्यांचा मोदी आपल्या प्रचाराच्या भाषणात उपयोग करुन जनतेच्या भावनेला हात घालतील असे वाटलेच होते. परंतु 370 कलमाबाबत कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव न घेता त्यांना370 चा कळवळा निर्माण झाल्याचा टोला मोदींनी शरद पवार आदींना लगावला. पाऊण तासाच्या भाषणात मोदींनी विरोधी पक्षांना काहीच किंमत दिली नाही. एकदोन वेळा विरोधी पक्षांचा नामोल्लेख केला तेवढेच. अन्यथा संपुर्ण भाषण भाजप, महायुतीच्या संदर्भातच बोलत होते. महाराष्ट्रात आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला विकास करण्यासाठी महाजनादेश द्या, असे आवाहन केले. 600 कोटी रुपयांच्या मेगा रिचार्ज योजनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी जी अवहेलना होतेय ती दूर होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. एकंदरीत मोदींनी आपल्या जोशपुर्ण भाषणात विकासाच्या मुद्यांवरच भर दिला हे विशेष. पुरुषांपेक्षा महिलांनी महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान करतील असा विश्वाससुद्धा मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त करुन महिलांना उद्देशून त्यांचेकडून होय असे वदवून घेतले. महिलांबरोबरच तरुणांकडेही आपला मोर्चा वळवला आणि मोदी- मोदीच्या गजरात त्यांना प्रतिसाद मिळाला. विकासासाठी महायुतीला महाजनादेश देण्याचे आवाहन हेच मोदीच्या भाषणाचे सूत्र होते.
पंतप्रधान नद्र मोदींच्या जाहीर सभेत हिरो ठरले ते पालकमंत्री व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मोदींच्या जाहीर सभेचे गिरीश महाजनांनी केलेल्या नियोजनाशी सर्वत्र चर्चा होती. पालकमंत्री गिरीश महाजन हे एक साध्या कार्यकर्त्यासारखे धडपडत होते. व्यासपीठावरील बैठकीचे नियोजन, प्रधानमंत्र्यांचे वाल्मिक ऋषींची प्रतिमा देऊन करण्यात आलेले स्वागत समयसूचकता दर्शवित होते. मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच वाल्मिक ऋषींना नमन केले हे विशेष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा भाजपचे संकटमोचक म्हणून उल्लेख करुन उत्तर महाराष्ट्रातील संपुर्ण निवडणुकीची धुरा महाजन यशस्वीरित्या सांभाळत असल्याचा पंतप्रधानासमोर उल्लेख केला. नाशिकला महाजनादेश यात्रेचा झालेला समारोपरंभाच्या यशस्वीतेनंतर जळगावची पंतप्रधान मोदींची पहिली सभा यशस्वीरित्या पार पडली. स्वत: मोदींनी सभेला लाभलेल्या प्रचंड उपस्थितीचा विशेष उल्लेख केला. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे महाराष्ट्र भाजपातील स्थान आणखी उंचावणार यात शंका नाही.