पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पोलीस त्यांचे कर्तव्य निभावण्याची करिता दिवस- रात्री महामार्गावर कार्यरत असतात. रात्रीच्या अंधारात वाहतूक पोलीस कर्मचारी न दिसल्याने होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महामार्ग वाहतूक पोलिसांना 105 रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप केले. सदरच्या रिप्लेक्टर जॅकेटवर गाडीची लाईट पडल्यावर ते चमकून उठून दिसतात त्यामुळे महामार्गावर कार्यरत असलेले वाहतूक पोलीस वाहनचालकांना लांबूनच दिसून येतील व महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वाहतूक पोलिसांच्या जीवाचे रक्षण होण्यास मदत होईल.
अपघातातील जखमींना घटनास्थळी तेथील पोलीस पोहचण्या अगोदर तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या उद्देशाने अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून मार्च 2021 पासून महाराष्ट्रात हायवे मृत्युंजय दूत तयार करण्यात आले आहेत. मात्र रात्री-अपरात्री महामार्गावर सेवा देणाऱ्या याच पोलिसांना बेधुंद वाहन चालकांमुळे अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे सदर वाहन चालकांना वाहतूक पोलिस लांबूनच दिसण्यासाठी पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांनी त्यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त वक्रतुंड मित्र मंडळ पेण तर्फे महामार्ग सुरक्षा रायगड विभागातील पोलिसांना 105 रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक गौरी मोरे, वक्रतुंड मित्र मंडळ संस्थापक दत्ता कांबळे, राजू कांबळे, सचिन म्हात्रे, जयेश पाटील, रोहन पाटील, ओंकार डाकी, स्वप्नील पाटील, अनिकेत पाटील, महेश म्हात्रे आदी उपस्थित होते.