जळगाव जिल्ह्यात विशेषत: गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपशावर शासनातर्फे नियंत्रण घालावे, अशी मागणी वारंवार गिरणा नदी काठच्या गावातील ग्रामस्थांकडून होते. अनेक वेळा नदी काठच्या गावातील ग्रामस्थांकडून गिरणेतून होणारा अवैध वाळूचा उपसा रंगेहात पकडून महसूल खात्याच्या सुपूर्द केला. तथापि त्यानंतर पुढे त्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पुढे काय कारवाई झाली हे कळत नाही. कालांतराने पुन्हा त्याच ठिकाणी अवैध वाळूचा उपसा होत असतांना दिसतो. त्यामुळे गिरणेकाठच्या ग्रामस्थांची कुचंणा होते. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते.
अवैध वाळू उपसा करण्यारे उजळ माथ्याने वावरत असतात. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातात. त्यांचे ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात येतात. त्यानंतर सुध्दा कायद्यांमधील पळवाटांचा फायदा घेऊन हे वाळू तस्कर सहिसलामत सुटतात. रितसर कायद्यानुसार त्यांचेवर दंडात्मक कारवाई होते. तो दंड वाळू तस्करांकडून भरला जातो. दंड भरला की त्यांची सुटका होते. दंडाचे पैसे भरणे त्यांचेसाठी किरकोळ बाब आहे. कारण अवैध वाळूमधून वारेमाप पैशाची कमाई या वाळू तस्करांकडून केली जाते. त्यामुळे दंड भरणे त्यांचेसाठी किरकोळ बाब आहे याचा अर्थ वाळूमधून किती मोठ्या प्रमाणात कमाई होते हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे वाळू तस्करांवर लावण्यात येणारी गुन्ह्यांची कलमे कडक असली पाहिजे. प्रसंगी कायदा बदलवून त्यांचेवर कठोर कारवाई झाली तरच ते पुन्हा अवैध वाळूची तस्करी करण्यास धजावणार नाहीत.
तथापि तसे होत नाही हे सत्य आहे. त्यामुळे अवैध वाळूची तस्करी थांबत नाही. वाळू तस्करांचे हात फार वरपर्यंत पोहोचलेले आहेत, असा वारंवार आरोप होतो आणि त्यात तथ्यांश आहे. ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो` हा वाक्प्रचार तंतोतंत लागू होतो. वाळू तस्करांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू ट्रॅक्टरमध्ये भरतांना पकडलेले ट्रॅक्टर्स रंगेहात पकडून जप्त करून जिल्ह्याधिकारी आवारात वाळूसह ट्रॅक्टर ठेवले असते. ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर त्या ट्रॅक्टर्सचे पुढे काय झाले काय कारवाई झाली? याबाबत संंधित प्रशासनाने जाहीर करायला हवे. तथापि जनतेची मेमरी कमी असते कालांतराने त्याचा विसर पडतो आणि त्यानंतर पुन्हा ते वाळू तस्कर उजळ माथ्याने रस्त्यावर फिरतात.
गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न अत्यंत गाजतोय. कारण गिरणा नदीचे वाळवंटात रूपांतर होत आहे. त्यावर प्रतिबंध आणला नाही तर गिरणा नदी पात्रात पाणीच उपलब्ध राहणार नाही. जळगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातील वाळूचा लिलाव अद्याप झालेला नाही. तथापि वाळूचा लिलाव झाला नसतांना त्या ठिकाणी वाळूचा अवैध उपसा होतोच कसा? ज्या ठिकाणचा अद्याप वाळूचा लिलाव त्या ठिकाणचा वाळू उपसा होत असेल तर अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. जेणेकरून नदी पात्रात ट्रॅक्टरसह उतरण्याची त्यांची हिंमत होणार नाही. परंतु सौम्य कारवाईमुळे वाळू तस्करांना फावते. सध्या खा. उन्मेश पाटील यांचे नेतृत्वात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. शुभारंभ कानळदा येथील गिरणाकाठच्या कण्वाश्रमापासून झाला. शुभारंभाला जलतज्ञ राजेंद्रसिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्रसिंह यांनी केलेले भाषण सर्वांच्या डोक्यात अंजन घालणारे म्हणता येईल. माणूस जिवंत राहण्यासाठी जसे फुफ्फुसांची आवश्यकता असते त्याप्रमाणे नदीतील वाळू म्हणजे नदी जिवंत राहण्यासाठी त्यातील वाळू हे तिचे फुफ्फुस आहेत. एवढे महत्व वाळूचे आहे. तरीदेखील आम्हाला त्याचे महत्व कळत नाही.
300 कि.मी. गिरणा नदीच्या काठावर आठवड्यातून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस परिक्रमा करण्यात येते. पहिल्या दिवशी म्हणजे शुभारंभालाच गिरणा परिक्रमाच्या संदर्भात टीका टिप्पणी सुरू झाली. परंतु टीकाटिप्पणीने आरोप प्रत्यारोपाने परिक्रमा यशस्वी होणार नाही. त्यासाठी सर्व स्तरावरून त्याला सहकार्य मिळणे अपेक्षित असते. तसेच मोटारीत बसून परिक्रमा करण्याबाबतही टीका झाली. त्यानंतर गिरणेकाठी पायी परिक्रमा सुरू झाली. परंतु शुभारंभात जो प्रतिसाद मिळाला असे भासविण्यात आले. त्यानंतर परिक्रमा ढेपाळल्याचे कळते. याचे एकमेव कारण म्हणजे परिक्रमा सर्वसमावेशक होण्याऐवजी तिला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. विशेषत: भाजपचे परिक्रमावर वर्चस्व असल्याने इतर पक्षाचा त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर वाळू माफियांना भाजपसह सर्व पक्षाचे संरक्षण असल्याने प्ररिक्रमा यशस्वी होईलच कशी?