वाळूमाफियांच्या दहशतीचा हा तर कळसच !

0

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाळू ठेकेदारांची दादागिरी वाढतच आहे. अवैध वाळूचा उपसा करणार्‍यांवर प्रतिबंध केला म्हणून पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक करून त्यांचे सह त्यांच्या कुटूंबियांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न या वाळूमाफियांनी केला. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी पाचोरा येथे आपल्या पदाची सुत्रे घेतल्यापासून अवैध वाळूचा उपसा करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफड करतो तशी अवस्था या अवैध वाळू उपसा करणार्‍यांची झाली. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले. एका वाळूमाफियाचा ट्रॅक्टर राजेंद्र कचरे पाटलांने पकडल्याने त्याचा राग येवून या वाळूमाफियाने कचरे पाटलांच्या घरावर दगडफेक करून हम भी कुछ कम नही. असे दाखवून देण्याचा जणू त्यांनी प्रयत्न केला. आमच्यावर प्रतिबंध करीत असाल तर याद राखा. आमच्या नादी लागू नका. हाच हेतु ह्या दगडफेकी मागे असावा यात शंका नाही. मध्यरात्रीच्या सुमारास हे वाळूमाफिये मोटारसायकलीवर कचरे पाटलांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस येवून दगडफेक करतात. त्यात निवासस्थानाच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचासुध्दा फोडल्यात. कचरे पाटील यांच्या निवासस्थानावरील दगडफेक म्हणजे वाळूमाफियांचे नियोजित कटकारस्थानच होय. दरोडेखोराने ऐवज लांबविण्यासाठी सशस्त्र दरोडा टाकावा त्यातलाच हा प्रकार म्हणता येईल.
अवैध वाळू वाहतुक करणार्‍या वाळूमाफियांचा विषय जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून गाजतो आहे. महसूल खात्यातर्फे जेव्हा या वाळूठेक्याचा जाहीर लिलाव करण्यात येतो. त्यावेळचे दृष्यतर सिनेस्टाईल असते. तेथे सर्वसामान्यांचे काहीच चालत नाही. वाळूचे ठेके घेणार्‍या ठेकेदारांमध्ये काही बोटावर मोजण्या इतकीच नावे समोर येतात. एखादी नविन व्यक्ती ठेका घेण्यासाठी जाहीर लिलावात बोली बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची बोलतीच बंद केली जाते. असे प्रकार पहावयास मिळतात. गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍यावर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर अथवा तहसिलदारांवर वाळूमाफियाने वाळूंनी भरलेले ट्रक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रकारही केलेला आहे. रात्री अपरात्री अवैध वाळूची वाहतुक करणार्‍या ट्रक्टर अथवा डंपर भितीपोटी बेदरकारपणे चालविल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक जण चिरडले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघातानंतर एकतर ट्रक्टर अथवा डंपरचालक फरार होतात त्यामुळे अपघातात बळी गेलेल्यांना न्याय मिळत नाही. किंवा अपघातानंतर क्वचितच वाहनासह चालक सापडला तर पैशांच्या जोरावर ते सही सलामत सुटतात. त्यामुळे निष्पाप बळी जाणार्‍यांचा वाली कोण? या प्रश्‍नांचे उत्तर मात्र अनुत्तरित राहते.
पाचोरा येथील वाळूमाफियांची दगडफेक म्हणजे प्रशासकीय यंत्रणेला जणू त्यांनी हे आव्हानेच दिले आहे. आम्ही एकदा वाळूचा ठेका घेतला म्हणजे आमचे मालक आम्हीच. आमच्यावर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करू नका. वाळूमाफियांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. त्यांची हिम्मत वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे काही अधिकार्‍यांनी त्यांच्याशी केलेली मिलीभगत होय. मागे मनमाडमध्ये एका उपजिल्हाधिकार्‍याच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याच्या हृदयद्रावक घटना घडली त्यावर यावरची बरीच चर्चा झाली. हे प्रकरण अख्या महाराष्ट्रात गाजले. अवैध धंदे करणार्‍यांशी जर अधिकार्‍यांनी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला तर अवैध धंदे वाल्यांची हिमत वाढते. त्यातलाच तो प्रकार होता. असा निष्कर्ष त्यातून काढला गेला. जळगाव जिल्ह्यात सुध्दा वाळूमाफियामुळे अधूनमधून अशांततेचे वातावरण निर्माण होते. यातुन खुनाच्या घटनाही झालेल्या आहेत. वाळूमाफियांच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी काहीवंर स्थानबध्दतेची कारवाई सुध्दा करण्यात आली. तरीसुध्दा वाळुमाफियाची दादागिरी थांबत नाही. यामागचे इंगित काय? या प्रश्‍नांचा उत्तराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यातून सिध्द होते. ते अवैध वाळू उपशातून मिळणारा वारेमाप पैसा हे होय. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी ते महसूल मंत्री असतांना या वाळूमाफियांवर मोक्का कायदाअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली होती. तथापि त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या घोषणेची दुर्देवाने अंमलबजावणी होवू शकली नाही.
पाचोरा येथे प्रातांधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या निवासस्थानावर वाळूमाफियांवर केलेल्या दगडफेकीचा सर्वत्र निषेध केला जात आहे. प्रातांधिकारी राजेंद्र पाटील यांनी या घटनेसंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणार्‍यांपैकी एकाच्या मोटारसायकलीचा नंबर आणि एकाची ओळख त्यांना पटली असल्याचे कळते. आता या प्रकाराची पोलिसांनी कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दगडफेक करणार्‍यांना तातडीने अटक झाली तरच त्यांना वचक बसेल त्याच बरोबर अटक करून त्यांचेवर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. तशापध्दतीने कारवाई झाली तरच वाळूमाफियांच्या दादागिरीला आळा बसेल. अन्यथा त्यांची ही दादागिरी वाढतच राहील. वाळूमाफियांच्या अवैध वारेमाप वाळू उपसामुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे निर्माण होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून सुध्दा ही बाब अंत्यत घातक आहे. भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्‍न या वाळूमाफियाच्या अवैध वाळू उपसामुळे गंभीर बनणार आहे. याची दखल घेवून प्रशासनाने सुध्दा त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.