जळगाव :- मागील पाच वर्षापासून वाल्मिकीनगर, जैनाबादेतील १ हजार ५०२ कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांची ६ कोटी ८० लक्ष रूपयांची थकबाकी आहे. वारंवार मागणी करूनही थकबाकी वसुल होऊ शकत नसल्याने वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. वीजचोरीचे प्रमाणही अधिक आहे. तेंव्हा महावितरणची वाणिजिक्य हानी रोखण्यासाठी या भागातील २० वितरण रोहित्रांपैकी ३ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर एक वितरण रोहित्र वीज चोरी होणाऱ्या ठिकाणांपासून स्थलांतरीत करण्यात आले.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांत घरगुती १४५७ ग्राहकांची ६ कोटी ६३ लक्ष १९ हजार थकबाकी आहे. तर वाणिजिक्य (३६ ग्राहक), ओद्योगिक (९ ग्राहक) यांची थकबाकी १७ लक्ष ३८ हजार थकबाकी आहे. दोन दिवसापूर्वीच वाल्मीक नगरातील रहिवाशांनी अवाजवी आलेले बिल मान्य नसल्याचे सांगत रास्ता रोको आंदोलन केले होते.