भुसावळ :- भुसावळ शहरापासून किमान ३ कि मी अंतरावर असलेल्या वांजोळा गावात चोरटयांनी आपला मोर्चा वळवला असून घरातील लोकांवर दगडफेक करीत व एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन एकाच रात्री गावात तीन ठिकाणी घरफोडी केल्याच्या घटना घडल्या. या घरफोडीत चोरांचे हाती केवळ दहा वीस हजाराची रक्कम हाती लागली. चोरांच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरांनी तेथून काढता पाय घेत धूम ठोकली. या प्रकारामुळे वांजोळा गावातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.
वांजोळा येथील वसंतदादा नगर भागात दि ३१ मे च्या मध्यरात्री १२ ते १२. ३० वाजेचे सुमारास तीन ते चार जणांच्या टोळीने गावात तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. या चोरानी प्रथम वनकर्मचारी शुभम ठाकूर यांच्या घराचे दार वाजवले व मागील गेट उघडून आत प्रवेश केला. घरात शुभम रवींद्र ठाकूर यांच्या आईने शुभमला उठविले तेव्हा यातील एकाने शुभमला डोक्याला दगड मारला. आवाजाने आई धावली तर त्यांनी शुभमच्या आईवर देखील दगडफेक केली. यामध्ये दगड लागल्याने शुभम व त्यांची आई जखमी झाला. तेवढ्यात परिसरातील लोक जागे झाल्याने या चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला व त्यांनी तेथून पळ काढला.
दरम्यान चोरांच्या सहकारी दुस-या टोळीने गावातील भिल वस्ती येथे हल्लाबोल केला. आशाबाई अनिल भिल यांच्या घराची भिंत फोडून दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील आशाबाई जाग्या झाल्याने त्या जोरात ओरडल्यामुळे दोघा चोरांनी येथुन पळ काढला. तर तीस-या ठिकाणी ग्रामपंचायत परिसरातील संभाजी गिरधर पाटील यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कुटुंब गच्चीवर झोपलेले होते. घरात खाटेवर झोपलेल्या अनुसया गिरीधर पाटील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे वृद्ध महिला भयभीत झाल्या होत्या. याचा फायदा घेत चोरांनी घरातील सामानाची उलथापालथ करीत कपाटातील सुमारे 20 हजार रुपयांवर समाधान मागुन येथून पोबारा केला.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात कोणीही तक्रार न दिल्याने अद्याप पावेतो अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. चोरांनी दगडफेक करीत घरातील वृद्धेला चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मात्र गावकरी भयभीत झाले आहे. पोलिसांनी गावात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.