संबंधित आरोग्य अधिकारी रजेवर; फाइल अद्याप उघडलेलीच नाही,नागरिक मात्र त्रस्त
जळगाव :- शहरात वाढलेल्या वराहांच्या ज्वलंत प्रश्नाकडे शासन- प्रशासन, पोलीस सोयीस्कर कानाडोळा करत आहे. शहरातील जैनाबाद, कांचननगर, शिवाजीनगर परिसर भारत नगर या भागात डुकरांची संख्या वाढलेली आहे. शहरातील कांचननगर परिसरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मॉर्निंग वॉक करणार्या नागरिकांनाही डुकरांच्या झुंडींचा त्रास होत असून काहींनी रस्तेच बदलले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असताना शासन-प्रशासन व पोलीस ढिम्म असल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाचे दोन भाग प्रशासकीय सुसुत्रता यावी यासाठी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी आरोग्य विभागाचा काही भार डॉ. विकास पाटील यांच्याकडे सोपविला आहे. डॉ. पाटील हे मनपाच्या जन्ममृत्यू विभागात कार्यरत आहेत. सत्ताधार्यांनीही मागील महासभेत विद्यमान उदय पाटील हे अभियंता आहेत असे म्हणत डॉ. विकास पाटील यांनाच आरोग्य अधिकारीपदी पदस्थापना द्यावी, अशी मागणी करत ठराव पारीत केला होता. मात्र आयुक्तांनी आरोग्य विभागाचे दोन भाग करुन विभागातील तांत्रिक कामे उदय पाटलांकडे तर विभागातील आरोग्याच्या बाबींची जबाबदारी डॉ. विकास पाटील यांच्यकडे दिली आहे. त्यानुसार शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे, वराह आदींचा पदभार डॉ. पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र संबंधित विभागाची फाईल अद्याप कार्यालयाकडेच आहे. डॉ. पाटील यांनी पद्भार स्वीकारल्यापासून सदर फाईल पाहिलीच नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर गेले असल्याचे समजते.
प्रशासनासमोर दोन पर्याय
महानगरपालिका अधिनियमानुसार शहरात डुक्कर फिरताना दिसल्यास त्याचा उपद्रव होत असल्यास आयुक्तांच्या निर्देशाने त्यास ताबडतोब मारुन टाकता येईल. त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल. अशा प्रकारे मारण्यात आलेल्या डुकरांबाबत कोणत्याही भरपाईबाबत दावा करता येणार नाही. हा एक पर्याय होवू शकतो. तर मनपाने याबाबत 50 हजारांचे कोटेशन काढले आहे. त्यानुसार संबंधिताने डुकरे पकडून त्यांची विल्हेवाट स्वत: लावायची आहे. त्यानुसार कोटेशन मंजूर करुन कार्यादेश द्यायचे तेवढे बाकी आहे. मात्र डॉ. पाटील यांनी फाईल अद्याप पाहिलेलीच नाही. डॉ. विकास पाटील यांना दोन पर्याय असून ते याबाबत कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.