मुंबई : मुंबईतल्या वरळीमध्ये निर्माणाधीन इमारतीत बांधकाम सुरु असताना अचानक लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. वरळीतील ना म जोशी मार्गाच्या हद्दीतील हनुमान गल्लीतील या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. अंबिका बिल्डर्सकडून हे बांधकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना अचानक बांधकामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट कोसळली.
हनुमान गल्लीमध्ये 18 ते 20 मजली इमारतीचे काम सुरु होते. बांधकाम सुरु असताना अचानक बांधकामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत सहा कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळा पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पण यामधील पाच कामगारांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एका जखमी कामगारावर उपचार सुरु आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती अद्याप समजू शकली नाही. पण या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.