वरणगाव सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिला जखमी

0

नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाच्या डबल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकाकडे असलेली डबल बोअरची बंदुक (रायफल) असून ही बंदूक लॉक झाली होती हा लॉक काढताना अनावधानाने ट्रीगरवर बोट ठेवल्याने गोळी सुटली व ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात तीन महिला जखमी झाल्या . या घटनेनंतर जखमींच्या नातेवाईकांनी बँकेत धाव घेत संताप व्यक्त केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला त्वरित अज्ञात स्थळी हलवण्यात आले.

प्राथमिक समजलेल्या माहितीनुसार, वरणगावच्या सेंट्रल बँकेतील सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांच्याकडे असलेली बंदुक लॉक झाली व हे लॉक काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे ट्रीगरवर बोट ठेवले गेल्यानंतर एक गोळी सुटून ती त्यांच्या शेजारी असलेल्या प्रमिला वसंत लोहार (तळवेल), शोभा प्रकाश माळी (वरणगाव) व कलाबाई चौधरी (वरणगाव) यांच्या पायाला लागल्याने बँकेत प्रचंड खळबळ उडाली. पाहता-पाहता गावात ही वार्ता पसरताच शेकडो नागरीकांनी बँकेकडे धाव घेतली.

वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, सुनील पाटील, राहुल येवले, शेळके, कुलकर्णी आदींनीही धाव घेत जमावाला बाजूला करीत जखमींना हलवण्याकामी सहकार्य केले. नलू इंगळे (मेंबर) यांनी जखमींना उपचारार्थ हलवण्याकामी सहकार्य केले
गोळीबारानंतर बँकेतील व्यवहार ठप्प झाले असून पोलिसांकडून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांना नागरीकांच्या रोषानंतर पोलिसांनी सुरक्षीतस्थळी हलवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.