भुसावळ;- तालुक्यातील वरणगाव शहरातील राजमल ज्वेलर्स दुकान फोडण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (22, रा.पहूर पाळधी, ता.जामनेर) सिद्धार्थ उर्फ सोनू अरुण मस्के (रा.रेल्वे कॉलनी, कंडारी) यांना अटक केली आहे. वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडल्या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील व पहुर पाळधी येथील काही तरुण जळगाव जिल्ह्यात घरफोडी मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी सारखे विविध प्रकारचे गुन्हे करीत आहे. त्या अनुषंगाने बकाले यांनी सहा.पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील आदींच्या पथकाने पहुर येथून मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय-22, रा. पहूर पाळधी, ता.जामनेर) याला ताब्यात घेतले तर त्याची कसून चौकशी केल्यानंतर सिद्धार्थ उर्फ सोनू अरुण मस्के (रा. रेल्वे कॉलनी, कंडारी) याच्या सांगण्यावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी वरणगाव येथील राजमल ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची तसेच एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी सिद्धार्थ उर्फ सोनू याने आणखी काही मुलांना सोबत घेऊन चोर्या केल्या असल्याचा संशय आहे.

