फैजपूर प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून फैजपूर,सावदा,यावल, रावेर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी केली जात असून वनविभागाचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या तस्करांना आता कोणाचाही धाक राहिलेला नसून दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी होत असल्याचे दिसून येत आहे.
फैजपूरातील लाकूडसाठा अचानक झाला गायब
काही दिवसांपूर्वी फैजपूर येथील धाडी नदीच्या पात्रात सॉमिल च्या समोरच फक्त १० फुटांवर जवळपास १० ते १५ ट्रॅक्टर बेवारस लाकडांचा साठा पडून होते.त्यानंतर थोड्याच दिवसांनी सदर लाकडांचा साठा अचानक गायब झाला.गायब झाला की करण्यात आला? इतक्या मोठ्या प्रमाणावर पडून असलेला हा लाकडांचा ढिग नेमका कुठे गेला? कोणी गायब केला? कोणाच्या आशिर्वादाने गायब झाला? यामध्ये लाकूड तस्कर व वनविभागाचे अधिकारी यांची अर्थपूर्ण भागीदारी तर नाही ना? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
आॅक्सीजन टंचाई जाणवत असून झाडांची केली जाते कत्तल?
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकटासोबत सर्व मानवजात लढा देत असतांनाच सगळीकडे प्राणवायू (आॅक्सीजन) टंचाई निर्माण झाली आहे. आॅक्सीजन वेळेवर उपलब्ध न झाल्याने लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.अशा परिस्थितीत फैजपूर, सावदा,यावल, रावेर परिसरात मात्र प्राणवायू निर्मिती करणाऱ्या हजारो डेरेदार झाडांची खुलेआम राजरोसपणे अवैधरित्या कत्तल केली जात असल्याने हा प्रकार नेमका कोणत्या अधिकार्याच्या आशिर्वादाने सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्यांना नेमके अभय कोणाचे?
लाकूड तस्कर अवैधरित्या जंगलात वृक्षतोड करुन लाकूड काही दिवस तसेच पडू देतात त्यानंतर ट्रॅक्टरमधे भरुन अवैधरित्या या चोरीच्या लाकडांची वाहतूक करुन घेऊन जातात. आणि हा सर्व प्रकार वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी डोळे बंद करून बघत असतात.मग हे सर्व सुरू असतांना वनविभाग गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासन दरवर्षी वृक्षारोपण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतांना ज्यांच्या हाती ही जबाबदारी सोपवली आहे तेच अधिकारी, कर्मचारी थोड्या फायद्यासाठी अवैध वृक्षतोडीला व लाकूड तस्करांना प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा वनसंरक्षक यांनी लक्ष घालावे-मागणी
फैजपूर परिसरातील नाकेदार व वनपाल फक्त नावालाच उरले असून त्यांच्या डोळ्यासमोर राजरोसपणे सुरू असलेली अवैध वृक्षतोड व वाहतूक त्यांना अजिबात दिसू नये हा मोठा प्रश्न आहे.या सर्व प्रकाराकडे या विभागाचे वनसंरक्षक श्री.विक्रम पदमोर हे मात्र डोळे बंद करून बघत आहेत.त्यांनी वरील सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी होत आहे. या गंभीर प्रकरणात उपजिल्हा वनसंरक्षक तसेच जिल्हा वनसंरक्षक यांनी जातीने लक्ष घालावे व अवैध वृक्षतोडीला व लाकूड तस्करांना आळा घालावा तसेच दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.