पाचोरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना अशोक चौधरी (पाटील) यांची बुलडाणा जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली. याबाबत चाकणकर यांनी चौधरी यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान केला.
वंदना चौधरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा व जामनेर तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये प्रत्यक्ष फिरुन कोविड – १९ संदर्भात जनजागृती केली. त्यांनी कोरोना योद्ध्या म्हणून लढणार्या महिला डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस, सफाई कामगार आदी १५० महिलांचा सत्कार केला. कळमसरा येथे गावांमधील कर्मचारी व लोकसहभागातून साफसफाई करुन घेतली. गावात बाहेरुन आलेल्या व्यक्तींबाबत वेळोवेळी माहिती घेतली. आरोग्य सर्वेक्षणासाठी प्रशासनाला सहकार्य केले. क्वारंटाइन सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपाययोजनांबाबत लक्ष ठेवले. त्यांना या सामाजिक कार्यात त्यांचे पती व शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी यांची मोलाची साथ मिळत आहे.
वंदना चौधरी यांच्या राजकीयसह सामाजिक, आरोग्य विषयक कार्याची दखल घेवून त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाविषयी जनजागृती करणे, संबंधितांना राजकीयसह सामाजिक, आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे आणि पक्षसंघटनासाठी सहकार्यांसोबत व्यापक स्वरुपात कार्य करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.