नवी दिल्ली– नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार संतोष गंगवार यांची 17 व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तब्बल आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले गंगराम हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांच्याकडे हंगामी सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
संतोष गंगवार हे उत्तर प्रदेशमधील बरेली येथून निवडून येतात. हंगामी अध्यक्षपदासाठी मनेका गांधी आणि संतोष गंगराम या दोघांची नावे आघाडीवर होती. दोन्ही नेते आठ वेळा खासदार राहिले असून सध्या संसदेतील सर्वात ज्येष्ठ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. गंगवार हंगामी अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाल्याने मनेका गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या वेळी म्हणजेच सोळाव्या लोकसभेत माजी संसदीय कामकाजमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभेतील ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्याची परंपरा असली तरी सहाव्या लोकसभेत के एस हेगडे आणि सातव्या लोकसभेत बलराम जाखड यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले होते. हे दोन्ही खासदार पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले होते.