नवी दिल्ली/मुंबई :- १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्यासह दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु झाले आहे. यात महाराष्ट्रातल्या १४ मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, राजू शेट्टी, चंद्रकात खैरे या दिग्गजांचं भविष्य आज मतदानपेटीत बंद होईल. तर या टप्प्यात सर्वांत गाजलेला मतदारसंघ माढा तसंच जळगाव, जालना, रावेर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, इथेही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ जागांवर मतदान सुरू आहे. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या. २०१४ साली या ११७ पैकी ७१ जागा भाजपप्रणित रालोआने जिंकल्या होत्या. त्या कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. गुजरातच्या सर्व २६ व केरळमधील सर्व २0 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. उद्या मतदानामुळे कर्नाटकातील मतदानही पूर्ण होईल. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी प्रथमच निवडणूक लढवत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य उद्या, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यामुळे विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह थेट भाजपमध्ये गेले.