नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 95 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात 15 कोटी 79 लाख 34 हजार मतदान आपला हक्क बजावतील. या 96 मतदारसंघांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, फारुख अब्दुल्ला, खा. हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, कार्ती चिदम्बरम, तारीक अन्वर यांच्यासह 1600 उमेदवार रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी ५८ टक्के मतदान झालं होतं. या टप्प्यात किती मतदान होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रासह 12 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होणार असून, तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या 10 मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय तामिळनाडू (38), कर्नाटक (14), बिहार, ओडिशा व आसाम (प्रत्येकी 5), उत्तर प्रदेश (8),पश्चिम बंगाल व छत्तीसगढ ( प्रत्येकी 3), जम्मू-काश्मीर (2) तर मणिपूर,त्रिपुरा (प्रत्येकी एक) या राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरी ( प्रत्येकी ) मध्येही मतदान होईल.