लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी; आ. गुलाबराव पाटील

0

जळगाव दि. 18-
जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी, अशी मागणी जिल्हाभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांच्याकडे केली असून ही मागणी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचवतील, अशी माहिती शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत, पाचोर्‍याचे आ. किशोर पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे आदींची उपस्थिती होती. शिवसेनेची सोमवारी रोजी संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लोकसभेतील दोन्ही जागा, युती व्हावी की नाही?, राजकीय परिस्थिती याबाबत लोकप्रतिनिधींच मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह शेतकर्‍यांचे प्रश्न, पुलवामा घटना त्या अनुषंगाने दोन दिवसातील घडामोडींची चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यथा संपर्कप्रमुखांकडे मांडल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
शिवसैनिक हा आदेशाचा भूकेला
शिवसेना ही आदेशाचे काम करते शिवसैनिक हा आदेशाचा भूकेला आहे. मुक्ताईनगरातील शिवसेनाही पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच काम करेल, असे त्यांनी शिवसेना खडसेंच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही या विषयावर बोलताना केले. माजी आ. आर. ओ. तात्या पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई येथे रुग्णालयात दाखल असल्याने उद्धव ठाकरे यांची नियोजित सभा रद्द करावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले. पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर आमचे सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत. देशाचा विषय आहे आधी देश महत्वाचा, त्यांचे कार्यक्रम चालू आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, असे भाजपाचे उद्घाटन सोहळे चालू असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.
शहा व ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद
शिवसेना व भाजप युतीबाबत मुंबईत सोमवारी संध्याकाळी 6 वा. भाजपाचे पक्षप्रमुख अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद आयोजित केली असल्याची माहिती यावेळी संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.