नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये ६७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. ८ कोटी ७५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, राजस्थानातील १२, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल प्रत्येकी सात, बिहार पाच, झारखंड चार, जम्मू आणि काश्मीर व लडाखमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या ५१ जागांवरील मतदान पूर्ण झाल्यावर लोकसभेच्या ५४३ जागांपैकी सव्वाचारशे जागांवरील राजकीय गजबज थंडावेल. सहाव्या व सातव्या टप्प्यात प्रत्येकी ५९ जागांसाठी १२ मे आणि १९ मे रोजी मतदान होईल. या फेरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बिहारमध्ये भारत-नेपाळ सीमा बंद करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या जोडीलाच सीमा सुरक्षा दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.