जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून ठरवून विरोध होत आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी लज्जास्पद असा गनीमी कावा करीत रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली.
निषेध व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? लोकशाहीला काळीमा फासणारी तसेच राज्यातील शांततेचे भंग करणारे सदर कृत्य दिसून येते. रात्री बेरात्री अयोग्य वेळी कुणाच्या निजी निवासस्थानी जाऊन असे करणे समाजातील शांतता भंग करण्यासाठीचा ठरवून केल्याचा प्रकार दिसून येतो. एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाला या प्रकारचे वागणे शोभणारे नाही. अशा पायंड्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सतत होत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत साहेब यांच्या पुतळ्याचे दहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर अनाधिकृत रित्या करण्यात आले. यावेळीसुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते 100 ते 150 च्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्रांगणात अशा रितीने कृत्य करणे कितपत योग्य कायद्याच्या चौकटीत आहे? जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने पोलीस अधिक्षकांनी झालेल्या प्रकारावर त्वरीत गुन्हा दाखल करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मंगळवारी दुपारी देण्यात आले. दोषींवर कारवाई करण्याची सुरूवात झाली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगीतले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवासेना सहसचिव विराज कावडीया, जळगाव लोकसभा युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपजिल्हा युवाधिकारी विकास पाटील, तालुका युवाधिकारी सचिन चौधरी, यश सपकाळे, विधानसभा युवाधिकारी विजय लाड, विभाग प्रमुख निलेश वाघ, राकेश चौधरी, गिरीश सपकाळे, सागर हिवराळे, अमोल मोरे, युवतीसेना उपशहर प्रमुख वैष्णवी खैरनार, अमित जगताप, प्रितम शिंदे, शंतनू नारखेडे इत्यादी उपस्थित होते.
एखाद्या कायद्याला विरोध करावयाचा असल्यास लोकशाहीने यासाठी वेगवेगळे मार्ग दिलेले आहे. अशा रितीने कायद्याचा भंग करून निषेध करणे लज्जास्पद आहे. भाजप युवा मोर्चा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांना विद्यापीठ सुधारणा कायद्याविषयी चर्चा करावयाची असल्यास आम्ही युवासेना व महाराष्ट्र विकास आघाडीचे पदाधिकारी 24 तास उपलब्ध आहोत. समोर येऊन चर्चा करावी. रात्री बेरात्री असे लपून छपून केलेले कृत्य शोभणारे नाही.