अमळनेर-परिसरातील भूमीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या निम्न तापी पाडळसरे धरणासाठी अर्थसंकल्पात 135 कोटी निधीची तरतूद करून आणल्याने आमदार अनिल पाटील यांच्यावर सर्व स्तरातून सत्काराचा वर्षाव होत असताना आमदारांनी हितचिंतकांचे आभार व्यक्त करत मी तर लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्य निभावतोय अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आ.अनिल पाटील यांचे मुंबई अधिवेशन आटोपून अमळनेरात आगमन झाल्यापासून त्यांचा सत्कार करणाऱ्यांची रिघच लागली आहे,रेल्वे स्थानकावर धरण जनआंदोलन समिती,राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व हितचिंतकांनी सत्कार केला,यानंतर त्यांच्या निवासस्थानी विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी,ग्रामीण भागातील ग्रा.प व राजकीय पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी, व्यापारी बांधव,महिला मंडळ,तरुण आणि जेष्ठ कार्यकर्ते आदीनी त्यांची भेट घेऊन विशेष असा सत्कार केला,तसेच गेल्या दोन दिवसात देखील सकाळपासून सत्कार करणाऱ्यांची गर्दी सुरू होती,सदर सत्कारामुळे आमदार देखील भारावल्याने त्यांनी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की अमळनेर येथे प्रशासकीय इमारतीचा प्रश्न रेंगाळलेला असताना या महाविकास आघाडीने अत्यंत कमी वेळेत त्यास मंजुरी दिली एवढेच नव्हे तर त्यावर या अर्थसंकल्पात 14 कोटींची तरतूद देखील करून दिली,हा निधी महसूलच्या इमारस्तीसाठी असून शहर पोलीस ठाणे आणि निवासस्थानांच्या स्वतंत्र इमारतीसाठी बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे
प्रयत्न सुरू आहेत.रस्ते विकासासाठी आता 25 कोटींची तरतूद झाली,आणि प्रामुख्याने पाडळसरे धरणासाठी 135 कोटीं निधीची तरतूद या शासनाने करून दिली आहे,या अधिवेशनात एकूण 240 कोटी निधी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून धरणाचा 100 कोटी निधी आपण डिसेंम्बर पर्यंत खर्च केल्यास अजून 50 कोटी आपल्याला याच वित्तीय वर्षात मिळणार आहे,त्यासाठी धरणाचे काम अतिशय गतीने करण्याच्या सूचना आपण संबधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारास दिल्या असून कामाकडे माझे संपूर्ण लक्ष राहणार आहे.केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असताना साधारणपणे 3 महिने काम बंद राहील असा अंदाज असून त्याव्यतिरिक्त कामाची गती वेगातच राहणार आहे,कोणत्याही परिस्थितीत काहिनाकाही पाणी अडविले जाईल यांनुसारच बांधकामाचे नियोजन असून प्रत्यक्षात पाणी अडल्यानंतर या भूमीतील माझ्या शेतकरी बांधवांचे जे उत्पन्न वाढेल तो आनंद मला पाहायचा असून सोबतच उद्योग आणि व्यवसायाची आर्थिक भरभराटी मला लवकरच पहायची आहे.
या गोष्टी जादूची कांडी फिरविल्यासारख्या लगेच होतील असे मला मुळीच म्हणायचे नाही पण नियोजन मात्र त्याचदृष्टिकोनातून आणि तसेच व्हिजन ठेऊन होत असल्याने तसे सुगीचे दिवस या भूमीत येतीलच हा माझा आत्मविश्वास आहे.मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री ना जयंतराव पाटील,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासनाचा वरदहस्त आपल्या मतदारसंघावर असून आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत देखील या शासनाने भरभरून दिले आहे.यामुळे जनतेच्या वतीने मी सर्वांचे आभार मानत असल्याचे आमदारांनी सांगितले.
तसेच येथील जनतेने भूमिपुत्र म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखविला ती एक मोठी देणं माझ्यासाठी आहे,राजकीय श्रीगणेशा केल्यापासून अनेक व्हिजन माझ्या डोक्यात असून धरणाचा बारकाईने अभ्यास करून तांत्रिक त्रुटी दूर करत कामाचा मार्ग सुकर करीत आहे,मी जे काही करतोय ते माझे कर्तव्य आहे,त्यात वेगळं असं काही नाही,असेच पाठबळ,प्रेम आणि आशीर्वाद जनतेने सदैव पाठीशी असू द्यावा अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली.