सुविधा देण्याच्या हालचाली : आरोग्य विभागाकडून होणार स्वच्छता
जळगाव, दि. 24 –
शहरातील चारही स्मशानभूमीच्या झालेल्या दुरावस्थेची महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली असून त्यांच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी पाहणी करणार असून आरोग्य विभागाकडून स्वच्छता राबविण्यात येणार आहे.
दै. लोकशाहीने शहरातील स्मशानभूमीच्या दुरावस्थेच्या बाबतीत वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपाने गंभीर दखल घेतली आहे. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी होणारी हेडसांडीबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील नेरीनाका, मेहरुण, शिवाजीनगर आणि पिंप्राळा येथील स्मशानभूमीच्या अतिशयद दयनीय अवस्था झाली असून तेथे नागरी सुविधांची वाताहत झालेली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्मशानभूमीत विविध सुविधा, दुरुस्ती करण्यासाठी मनपा आता पुढाकार घेणार असून आवश्यक त्या सुविधा त्वरीत पुरविण्यात येतील अशी माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.
आरोग्य विभाग करणार स्वच्छता
स्मशानभूमीत स्वच्छतेचे तीनतेरा झाले असून तेथील स्वच्छता करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे देण्यात आली असून लवकरच तेथील स्वच्छता करण्यात येणार आहे.
स्मशानभूमीतील पथदिव्यांची झालेली अवस्था देखील रात्रीच्या अंत्यसंस्कारात बाधा आणत आहे. येथे पाण्यासाठी होणारी पायपीट थांबविण्याची आवश्यकता आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराप्रसंगी पाण्याची आवश्यकता असताना देखील येथे पाण्याचा ठणठणाट आहे. अपूर्ण व्यवस्थेमुळे स्मशानभूमीच चितेवर असल्याचे चित्र आहे. आयुष्याचा शेवट गोड व्हावा यासाठी मनपाने पुढाकार घेवून सुविधा त्वरीत द्याव्यात अशी मागणी होत आहे.