पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे गुरुवारी मध्यरात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुरांच्या गोठ्यास विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठी पशूहानी झाली आहे.शेतकरी बांधवांनी जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत जळल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकरी अरूण शिवाजी पडोळ, शिवराम शिवाजी पडोळ, दिपक शिवाजी पडोळ, सुधाकर धनजी भागवत यांच्या गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे गाई -गुरे -म्हशी बांधलेले होते . गुरुवार दिनांक ४ मार्च २०२१ च्या मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली . सुरुवातीला कमी वाटणाऱ्या आगीने मात्र वेळातच रौद्ररूप धारण केले . या आगीमध्ये एका गायीसह म्हशीची २ पारडू जळून भस्मासात झाले तसेच २ म्हशी डोळ्यात अंध झाल्या असून सुमारे १३ गुरे आगीमुळे होरपळली आहेत . या यागीत मानवी जीवीताची हानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांचे ५ ते ८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
खळ्यात साठवलेले अन्नधान्य , नवीन ५ क्विंटल गव्हाची पोती, २ क्विंटल तूर ,चारा . पशुखाद्य , कुट्टी , लाकडी कृषी अवजारे , टोमॅटोचे कॅरेट, ढेपची पोते , ठिबक नळ्यांचे बंडले यासह होते नव्हते सर्वच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले .आगीचे लोळ इतके प्रचंड होते कि , सर्वदूर धुराचे लोट उठत होते .घटनेची वार्ता गावात वार्यासारखी पसरली . गावकरी मोठ्या संख्येने आगीच्या दिशेने धावले . मध्यरात्री तरूणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . सर्व जण आपापल्या परीने हंडा -बादलीच्या साहय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते . पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ , बीट हवलदार शशिकांत पाटील आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले . पहाटे पर्यंत धुराचे लोट सुरू होते .पोलीस निरीक्षक राहुल खताळ आपल्या सहकाऱ्यांसोबत तीन तास ठाण मांडून होते . जामनेर नगर परिषदेच्या अग्नीशामन दलासही पाचारण करण्यात आले . अग्नीशमन दलाच्या २ गाड्या आल्या खऱ्या , परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . अखेर अग्नीशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले .
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . राठोड , जामनेरचे कृषी वैद्यकिय अधिकारी , तसेच पहुरचे तायडे यांनीही गुरांवर उपचार केले . प्रचंड भितीदायक वातावरण होते . शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात आहेत . त्यातच अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . या घटनेमुळे स्थरातुन हळहळ व्यक्त होत आहे .
भय इथले संपत नाही –
आता आग शमली असली तरी जखमी झालेली जनावरे मरण यातनांनी विव्हळत आहेत . गोठ्यात फक्त शिल्लक राहीली आहे राख अन् कोळसा. गोठ्या कडे पाहिल्यावर वाटते भय इथले संपत नाही.
जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत झाले भस्मसात –
जीवापाड जपलेल्या गाई – गुरांना डोळ्या देखत जळतांना पाहून शेतकऱ्यांचे हृदय हेलावून गेले. आगीच्या जबड्यातून गुरांना काढण्यासाठी गावकरी सरसावले होते. आज सकाळी तलाठी स्वाती भंगारे यांनी पंचनामा केला .यावेळी सरपंच राजमल भागवत पोलीस पाटील संगीताबाई सुभाष चिकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाबाई राघो पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी शेतकरी अरुण पडोळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .मुक्या जीवांच्या वेदना मन सुन्न करणाऱ्या आहेत .या संकटातून सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे .