जळगाव । कोरोनामुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, तरीही शहरी तसेच ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारु, गावठी दारु विक्रीचे प्रकार समोर येत आहे. जळगावात बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस पोलीसांनी अटक केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात संशयित आरोपी मनोज श्रीधर महाजन (वय-३३, रा. खंडेराव नगर, पिंप्राळा )हा रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका कापडाच्या पिशवीत देशी दारू विक्री करतांना आढळून आला. एमआयडीसी पोलीसांनी त्याला अटक करत त्यांच्या ताब्यातील १ हजार ३०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. पोकॉ गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.फौ, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर यांनी केली.