‘लॉकडाऊन’चे पालन करून सिंचन क्षेत्रासह पुलांची कामे केली पाहिजे ; गिरीश महाजन

0

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आणि लॉक डाऊन सुरु आहे. दरम्यान, या काळात सिंचनाची कामे बाकी असल्याने टंचाईची स्थिती येण्याचा धोका असून ही स्थिती टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’चे सर्व नियम पाळून सिंचन क्षेत्र तसेच पुलांची अत्यावश्‍यक कामे शासनाने सुरू करण्यात यावी, असे मत राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात कोरोना रूग्ण वाढीबाबत आज जी परिस्थिती आहे. त्याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. अत्यावश्‍यक कामे सुरू करतांना कामगारामध्ये सोशल डिस्टन्सींग राहिल. त्यांना मास्क, हॅंडग्लोज, सॅनेटायझर दिले जाईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व अटी पाळूनच ही कामे सुरू झाली पाहिजेत आणि शासनाने त्याबाबत निर्णय घेतले पाहिजेत.  दरम्यान, शासनाने पालिका क्षेत्राबाहेर अत्यावश्‍यक कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याच अंतर्गत सिंचनाची जी अपूर्ण कामे आहेत. ती सुध्दा पूर्ण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही महाजन म्हणाले.

या सरकारने सिंचन क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे अनेक कामे बंद करण्यात आली. ती कामे पूर्ण झाली असती तर आता टंचाई काळात अडचण निर्माण झाली नसती. शासनाने त्यावरील स्थगिती उठविली असली तरी लॉकडाऊनमुळे ही कामे रखडली आहेत. त्यामुळे शासनाने आता ही कामे प्राधान्याने सुरू करावीत. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.

राज्यातील कमकुवत पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची गरज
काही भागात पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यात कठीण स्थिती होण्याचा धोका आहे. अनेक भागातील नदी तसेच नाल्यावरील पूल कमकुवत झाले असून त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची गरज आहे. त्यामुळे प्राधान्याने करावयाच्या कामांची जिल्हानिहाय माहिती घेवून शासनाने ती त्वरीत सुरू केली  पाहिजेत. यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्याची गरज आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.