लूई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

0

चाळीसगाव : राष्टीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य व विभागीय शाखा नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भडगाव रोड येथील भूषण मंगल कार्यालयात आयोजित या स्पर्धांचे उद्घाटन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विद्यालयाचे प्रा.डॉ.एस.आर.जाधव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जनरल सेक्रेटरी डी.पी.जाधव, चाळीसगाव अंधशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पी.एस.एरंडे, रयत सेनेचे गणेश पवार, दृष्टिहीन संघाचे चाळीसगाव शाखाध्यक्ष साहेबराव पगारे, रोटरीचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, प्रमोद शिंपी, संजय घोडेस्वार, आनन शिंपी, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ, बालू पवार सर आदी उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर संवाद साधताना आमदार मंगेशदादा यांनी सांगितले की, आज जगाचे सौंदर्य आपण दृष्टी असल्याने पाहू शकतो, मात्र इतक्या सुंदर जगाची अनुभूती केवळ दृष्टी नसल्याने लाखो अंध बांधवाना घेता येत नाही. जो त्या वेदना भोगतो त्याची जाणीव फक्त त्यालाच असू शकते. स्वतः लहानपणापासून अंध असलेले फ्रांस येथील लुई ब्रेल यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची लिपी / पद्धत विकसित केली व एक मोठा आशेचा किरण अंधांच्या जीवनात ब्रेल लिपीच्या माध्यमातून निर्माण केला.

आपले संवेदनशील पंतप्रधान मोदिजीनी अंध – अपंगाना देशभरात दिव्यांग हा शब्द प्रचलित करून त्यांचा सन्मान केला आहे. आज आपण रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट येथे चढण्या उतरण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर केलेला दिसतो, पूर्वी हे कुणाला सुचले नाही हे दुर्दैव… अंध बंधू भगिनींच्या समस्या या त्यांच्या नसून माझ्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असून तालुक्यातील अंध बांधवांचे संघटन करून त्यांच्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार मंगेश शेवाळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.