धरणगांव, प्रतिनिधी –
बंद घोषित झाला आणि,
माझ्या मनात धस्स झाले.
जगण्याचे असंख्य प्रश्न,
माझ्या समोर उभे राहिले !
कवीच्या कवितेतल्या या ओळी जेव्हा जीवनात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात तेव्हा कवीची दारशनिकता मान्य करावी लागते. विविध मागण्यांसाठी, सरकारच्या विरोधात, गुन्हेगारांच्या विरोधात अनेकदा बंद पुकारला जातो. या बंदमध्ये गोरगरीब जनता भरडली जाते. त्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. मात्र, कोरोनाच्या लाॅकडाऊन कालावधीत सर्वात जास्त कुचंबणा होतेय ती हातावर पोट असणाऱ्या हातमजूर लोकांची. कापसाच्या जिनिंग मिल, कारखाने, दुकाने, हाॅटेल, बाजारबंद पडल्याने या ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना घरी बसावे लागले आहे. रोगापासून बचाव तर हवाच आहे. मात्र, पोटाची भूकही भागवायची आहे. घरी बसून कोरोनापासून दूर पळता येईल परंतू सदोदीत सोबत असणाऱ्या पोटाच्या भूकेला कशी पळवून लावायची ही चिंता आता गोरगरीब मजूरांना सतावत आहे. अशा लोकांसाठी काही सामाजिक संस्था पूढे येत आहेत. आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्यात धरणगावची मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनने जिवनावश्यक वस्तूंचे पॅकेट तयार करुन वाटप सुरु केली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
धरणगावातील मुन्नादेवी आणि मंगलादेवी हे फाऊंडैशन गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असते. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे. त्यांचा शालोपयोगी खर्च करणे, गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी ही संस्था प्रयत्नरत राहते. या फाउंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ, उद्योजक जिवनसिंह बयस यांनी सद्याच्या बिकट परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात पुढे केला.
कोरोना संकट काळातही या संस्थेने गरीबांसाठी मदत पॅकेट तयार केले आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. गहू ५ किलो, तांदूळ २ किलो, तुरदाळ १ किलो, तेल १ किलो, चवळी १/२ किलो, मिठ १ किलो. मिरची पावडर, गरम मसाला, हळद प्रत्येकी ५० ग्रॅम, बिस्किट पुडा १ असे पॅकेट प्रत्येक कुटुंबाला वितरीत करण्यात येत आहे. नागरीकांच्या गरजेची बारीक नोंद ठेवून ती त्यांच्यापर्यत प्रत्यक्षात पोहचवली जात आहे.
या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जिवनसिंह बयस, मुकेश बयस, तेजेन्द्र चंदेल, दत्तूनाना चौधरी, विलास बायस, जीतू बायस, गणेश सूर्यवंशी, दुर्गेश बायस, प्रीतम बायस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समाजात निर्ढावलेल्या प्रवृत्ती वाढत असतांना मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशन सारख्या संस्था आपला खारीचा वाटा घेवून मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. या मदतीने सर्व प्रश्न मिटतील असे नाही. मात्र, सकारात्मक सुरवात होणार आहे. इतरांसमोर एक आदर्श उदाहरण उभे रहात आहे. अश्या संस्थांचे कौतुक तर व्हायलाच हवे सोबत त्यांचे अनुकरणही करायला हवे. असे असंख्य हात पुढे आले तर कोरोना संकटावर मात करणे सहज शक्य होईल.