लासुर परिसरात शेतीसाठी फक्त ६ तास वीज !

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर) :- येथील मराठे फिडर वरील शेतकऱ्यांनी शेतात 24 तासांपैकी फक्त 6 तास शेतीला होणारा वीजपुरवठा याविरोधात कार्यकारी अभियंता प्रतीक टेकाळे यांना धारेवर धरले.लासुर हे गाव तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव असून देखील गावाला वीजप्रश्न मागील 10-15 वर्षांपासून भेडसावत आहे.याबाबत अनेकदा पाठपुरावा केला मात्र अजून देखील काही ठोस उपाययोजना राबविण्यात महावितरण अपयशी राहिल्याचे दिसून येत आहे.नवीन ट्रान्सफॉर्मर चा प्रस्ताव देखील पाठवला गेला असून त्याबाबत अजून काहीही हालचाली नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

दि.17 मार्च रोजी ग्रामपंचायत येथे कार्यकारी अभियंता टेकाळे यांना बोलवत शेतकऱ्यांनी त्यांचा समोर समस्यांचा पाढा वाचला.मागील एक ते दीड महिन्यांपासून फक्त ६ तास वीजपुरवठा होत असून तो ही मध्येच खंडित होतो शेतीला पाणी भरण्यासाठी मजुरास 200 रुपये मजुरी देऊन मजूर मात्र ४ तासात घरी परततो आणि रब्बीचे पीक ऐन काढणीवर आले असतांनाच पाण्याची कमतरता निर्माण होऊन पिके जळू लागली आहेत.शेतकऱ्यांचा या समस्या लक्षात घेऊन १ तास वीज वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे कार्यकारी अभियंता टेकाळे यांनी सांगितले.

यावेळी शेतीला पूरक अशी दिवसा ८ तास वीज मिळावी तसेच १० एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर ची उपलब्धता करावी जेणेकरून शेतकऱ्यांचा विजप्रश्न सुटून त्यांना दिलासा मिळेल अशा मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांनी दिले. यावेळी सरपंच जनाबाई माळी, उपसरपंच अनिल वाघ तसेच नरेंद्र माळी, सुरेश माळी, वासुदेव माळी,चंद्रकांत वाघ,तुषार वाघ,राजेंद्र महाजन,भिकन महाजन,गोरख पाटील,कुंदन बोरसे,विलास वाघ,भास्कर माळी, योगराज माळी,भगवान महाजन आदी शेतकऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या.

सध्या परिसरात एकच ट्रान्सफॉर्मर ने वीजपुरवठा होत असून अनेक शेतकरी अनधिकृत रित्या वीजवापर होत असल्याने ओव्हरलोड होऊन दिवसा पूरक पुरवठा करणे शक्य होत नाही.तरी शेतकऱ्यांचा मागणी खातर १ तास वीज पुरवठा वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे-प्रतीक टेकाळे (सहायक अभियंता)

पिकांवर रोगाचे सावट असतांना विजेचा समस्येपासून शेतकरी पूर्णपणे त्रस्त असून शेताला पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे लवकरात लवकर यासंबंधी काही उपाययोजना करण्यात येतील अशी अपेक्षा आहे-नरेंद्र माळी (शेतकरी)

Leave A Reply

Your email address will not be published.