अहमदपूर (प्रतिनिधी : तालुक्यातील महादेववाडी शिवारातील पाझर तलावात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील ग्रामस्थांच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान तलावाशेजारील शेती असलेल्या शेतकरी हे आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावाकडे गेले असता त्यांना तलावातील पाण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिस प्रशासनाच्या वतीने संशयित हातबॉम्ब फुटु नये. याची सर्वतोपरी सुरक्षितता निश्चित करण्यात आली असून बॉम्बशोधक व नाशक पथकास पाचारण केले आहे. ही वस्तू बॉम्ब सदृश्य असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास निकामी करण्यात येईल असे बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले, पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला, आलापुरे कार्य करीत आहेत.
बॉम्ब शोधक पथक दाखल
बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे अधिकारी, लातूर दहशत विरोधी पथकाचे जी.एस.गल्लेकाटू, सुर्या श्वान पथक आले असून बॉम्ब सदृश्य वस्तूला असलेली लोखंडी वस्तू गंजलेली आहे. या वस्तूच्या चोही बाजूंनी वाळूनी भरलेले पोते ठेवून सुरक्षा वाढवली आहे. घटनास्थळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार विक्रम काळे, पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लंजीले, पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला यांनी भेट दिली आहे. घटनास्थळी सकाळपासूनच लोकांनी गर्दी केलीअसून ग्रामस्थांमध्ये वस्तूबद्दल तर्कवितर्कांची चर्चा आहे.