पंढरपूर : कार्तिक एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, असं साकडं घातलं.
“अवघ्या जगासमोर करोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ करोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.