लढवय्या पँथर गेला! ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन

0

मुंबई – आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने आज सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या कन्या गाथा ढाले यांनी दिली. ढाले यांच्या पार्थिवावर उद्या (१७ जुलै) दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून उद्या दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे.

दलित पँथरचा महानायक हरपला – रामदास आठवले

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे अशी शोकभावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त करून राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.

Leave A Reply

Your email address will not be published.