जळगाव : स्वत:च्या लग्नासाठी कुटुंबाने जमविलेले पैसे खर्च केल्याने त्यामुळे वडील रागावले व त्या संतापात २३ तरुणाने वराड, ता.जळगाव येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. आकाश बाळू ठाकरे (२३, रा. खडके चौक, शिवाजी नगर, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा केटरींगचे काम करायचा तर आई, वडील शिवाजी नगरातीलच कंपनीत कामाला आहेत. यंदा आकाश याचे लग्न करण्याचे नियोजन कुटुंबाने केले होते, त्यासाठी पैशांची जुळवाजुळव देखील झाली होती, काही रक्कम घरात होती. नेमके हेच पैसे आकाश याने खर्च केले. हा प्रकार समजल्यानंतर वडील बाळू ठाकरे त्याला आम्ही तुझ्या लग्नासाठी पै पै जमा करतो अन् तु पैसे खर्च करतो असे संतापात बोलले. आकाश याला त्याचा राग आला, त्यामुळे रविवारी त्याने सकाळीच घरातून पाय काढला. दुपारी भाऊ दीपक ठाकरे याला फोन करुन मी आता तुम्हाला सापडणारच नाही असे सांगून मोबाईल बंद केला. रविवारी रात्री आकाश हा वराड येथे गेला, मात्र मावश्याकडे गेला नाही. थेट शेतात गेला तेथे निंबाच्या झाडाला गळफास घेतला. सोमवारी सकाळी नारायण जाधव शेतात भरणा करण्यासाठी आले असता आकाश हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. त्यांनी पोलीस पाटील देविदास पाटील व आकाशच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार शिवदास चौधरी, रतिलाल पवार, समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. तपास शिवदास चौधरी करीत आहेत.