नवी दिल्ली – मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020 -2021 चा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. दरम्यान, यामध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याप्रमाणे मुलींच्या लग्नासाठी वय वाढवण्यात आलं त्याप्रमाणे आई होण्याच्या वयोमर्यादेवर केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. महिलांसाठी विशेष उपक्रमांना २८ हजार ६०० कोटी रुपयांची घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली.
“आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार आहोत. यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती केली जाईल. ही टास्क फोर्स सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे,” अशी ममाहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेला जनतेनं चांगला पाठिंबा दिला आहे. या योजनेमुळे मुलगी-मुलगा गुणोत्तरात सुधारणा झाली. 10 कोटी कुटुंबांना पोषण आहाराची माहिती देण्यात आली आहे. 6 लाखहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन देण्यात आला आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.