नवी दिल्ली : सोन्याच्या चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जगातील बर्याच भागांत सोन्या-चांदीच्या किंमती वाढताना दिसून आल्या. पण कोरोना लशीबाबत सकारात्मक बातमी आल्यानंतर बाजारात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याचांदीच्या किंमतींवर झाला आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे दरही आज कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.9 टक्क्यानी कमी होऊन 49,051 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 550 रुपये अर्थात 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 59,980 रुपये प्रति किलो झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी घसरून 1826.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. जुलैनंतर सोन्याची ही निचांकी पातळी आहे. त्याचप्रमाणे चांदी 1.1 टक्क्यांनी घसरली आणि प्लॅटिनममध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली.
कोरोना लशीसंबंधित खुशखबरीनंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. आशियायी शेअर बाजारात देखील आज तेजी पाहायला मिळाली कारण, परवडणारी कोरोना लस बनवण्याच्या प्रगतीमुळे जागतिक आर्थिक सुधाराची आशा निर्माण झाली आहे. AstraZeneca ने सोमवारी कोविड -19 लसीविषयी सांगितले की ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या भागीदारीने विकसित होत आहे. ही लस इतर कंपन्यांपेक्षा खूपच स्वस्त आहे त्याचप्रमाणे 90 टक्के प्रभावी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीवर वाढता दबाव पाहायला मिळतो आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या वेबसाइटवरील माहितीनुसार डिसेंबरच्या डिलिव्हरीचे सोन्यामध्ये जवळपास 7 डॉलरची घसरण झाली आहे. यानंतर सोने 1898 डॉलर या दरावर ट्रेड करत आहे. तर चांदी घसरणीनंतर 24.35 डॉलर या स्तरावर ट्रेड करत आहे.