लखनऊ: उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज येथील न्यायालयात एका देशी बॉम्बचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटात अनेक वकील जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार असोसिएशनचे एक पदाधिकारी संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत.
संजीव लोधी हे लखनऊ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत, अशी माहिती सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश सिंह यांनी दिलीय. त्यांच्याच चेंबरसमोर तीन बॉम्ब फेकण्यात आले. या तीन बॉम्बपैकी एक बॉम्ब फुटला. तर दोन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुले देखील दाखवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.