जळगाव : रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते. जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केला.
रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं. त्यामुळे एकप्रकारे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना आमदारकी देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले.
रोहिणी खडसेंसाठी राष्ट्रवादी पूर्ण ताकद लावणार
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे आले होते. पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे.

