जळगाव : शहरातील प्रजापत नगर भागामधील रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. कल्पना नाना सपकाळे (३५) असे या महिलेचे नाव असून त्या कांचननगरातील आहे. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कल्पना या कांचन नगरात कुटूंबियासह वास्तव्यात होत्या. मजुरी करायच्या़ काही कामानिमित्त त्या शुक्रवारी प्रजापत नगराकडे गेल्या होत्या. दरम्यान रात्री काम आटोपून घराकडे परतत असताना परिसरातील रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सपकाळे यांना मृत घोषित केले़ यावेळी नातेवाईकांची एकच गर्दी झालेली होती.