नवी दिल्ली | वृत्तसंस्था
देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच करोनाच्या या लाटेमध्ये देखील महाराष्ट्र प्रमुख हॉटस्पॉट ठरला आहे. देशात रुग्णसंख्येचा नव्याने विस्फोट झाल्याने आरोग्यव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रचंड ताण आलाय. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात रुग्णांना बेड व औषधांसाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. करोना विषाणूग्रस्त गंभीर रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर करोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी वृत्तमाध्यमांना माहिती दिली आहे की,’पाच वैद्यकीय चाचण्याच्या आधारे असं दिसून आलं की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसंच आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलं नाही.’
तत्पूर्वी, रेमडेसिवीरमुळे करोनाबाधितांना व्हेंटीलेटरची गरज कमी झाल्याचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे करोनाबाधितांना त्यांच्या आजाराचे स्वरूप पाहिल्याशिवाय हे औषध देऊ नये, असा सल्ला जागितिक आरोग्य संघटनेने दिला होता.
करोनाबाबधितांमध्ये रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते, लवकर प्रकृतीत सुधारणा होते, असे कोणतेही तथ्य या बाबत नेमलेल्या समितीला आढळले नाही. या औषधामुळे करोनाच्या सुरवातीच्या काळात उपयोग होत असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्यामुळे त्याची मागणी वाढली होती. त्याला या आवाहनामुळे पायबंद बसण्याची शक्यता आहे.
सध्या जगभरात करोनावर औषध म्हणून रेमडेसिवीरसह दोन औषधे वापरली जात आहेत. पण या औषधाच्या वापराने रुग्णालयातील वास्तव्यात कोणतीही घट झाल्याचे आढळून आले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही करोनाच्या काळात याच औषधांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे संसर्ग कमी काळात बरा होतो, असे मानण्यात येऊ लागले.
जागतिक संघटनेच्या या आवाहनाला या औषधाची उत्पादक कंपनी गिलीडने आव्हान दिले आहे. अनेक विश्वासार्ह राष्ट्रीय आरोग्य संघटनांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांवर या औषधाची शिफारस केली आहे, असे निवेदन गिलीडने प्रसिध्दीस दिले आहे.