खामगाव (गणेश भेरडे)- कोरोना महामारी काळात अत्यावश्यक सेवा देणारांना कोव्हीड -19 च्या उपचारासाठी लागणार्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा 10 टक्के राखीव साठा वितरण करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनला सुचित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल आस्थापनेचा समावेश असल्याने औषध विक्रेत्यांचा सुध्दा यामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. चे सचिव अनिल नावंदर यांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने कोव्हीड 19 च्या उपचारासाठी लागणार्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन साठ्याच्या वितरणासाठी सुत्र निश्चितीनुसार साठा वितरीत करतांना एकुण प्राप्त साठ्यापैकी 10 टक्के साठा आपत्कालीन वितरणासाठी राखीव ठेवण्यात यावा. 10 टक्के राखीव साठ्यातुन आवश्यकतेनुसार प्राधान्याने फ्रंटलाईन वर्कर्स जसे पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्ग, आरोग्य विभागातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी वर्ग तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना वितरण करण्यात यावे अश्या सुचना सर्व रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या औषध विक्रेत्यांना देण्यात याव्यात असे कळविले आहे.
मात्र यामध्ये अत्यावश्यक सेवा देणार्या औषध विक्रेत्यांचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. याचा दुष्परिणाम औषध विक्रीवर होऊ शकतो असे स्पष्ट मत अनिल नावंदर यांनी व्यक्त केलेे आहे.