रुस्तमजी स्कूलच्या बसने विद्यार्थिनीला उडविले

0

जळगाव :- शहरातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली. पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) असे जखमी मुलीचे नाव असून ती रेल्वे स्टेशन परिसरातील बॉम्बे हॉटेलचे मालक अनिल कोरानी यांची मुलगी आहे. या अपघातात पलक गंभीर जखमी झाली असून, तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

पलक कोरानी ही शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण आर्ची आठवीला याच शाळेत शिक्षण घेत आहे. आर्ची ही मोहाडी रस्त्याजवळील थांब्यावरुन शाळेच्या बसने जाते. त्यासाठी पलक ही दुचाकीने (एमएच-१९ सीएम/६६६०) आर्चीला सोडण्यासाठी आली होती. थांब्यावर तिला सोडून बसमध्ये बसविले, त्यानंतर लगेच माघारी फिरली असता डी मार्टकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या शाळेच्याच स्कूल बसने (एमएच-१९ वाय/६२०१) दुचाकीला उडविले. यात पलकच्या डोक्याला तसेच कानाजवळ जबर मार लागला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर स्कूलबसचा चालक बससोडून घटनास्थळाहून पसार झाला होता. दरम्यान, दहा वाजता पोलिसांनी घटनास्थळावरून बस व दुचाकी ताब्यात घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.